Team MyPuneCity – शस्त्र बाळगल्या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. ही कारवाई रविवारी (20 एप्रिल) रात्री पावणेदहा वाजताच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथे करण्यात (Pimpri Chinchwad Crime News 21 April 2025) आली.
कृष्णा अजय आल्हाट (20, वल्लभनगर पिंपरी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भुरे यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृष्णा हा कोयता घेऊन नेहरूनगर येथील एच ए ग्राउंडच्या फूटपाथवर आला असल्याची माहिती संत तुकाराम नगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कृष्णा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 300 रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला आहे.
लवळे गावठाण येथे घरासमोरून जाण्यास मज्जाव करत एकास मारहाण (Pimpri Chinchwad Crime News 21 April 2025)
घरासमोरून जाणाऱ्या रस्त्याने जायचे नाही असे म्हणत एका व्यक्तीने एका तरुणाला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (19 एप्रिल) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास लवळे गावठाण येथे घडली.
हितेश गणेश पांढरे (24, लवळे गावठाण) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहुल सुरेश सुर्वे (40, लवळे गावठाण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हितेश हे त्यांच्या घरी आले असता आरोपी राहुल याने त्याच्या घरासमोरून जाणाऱ्या रस्त्याने जायचे नाही असे म्हणत हितेश यांच्याशी वाद घातला. कुऱ्हाडीच्या लाकडी दांड्याने हितेश यांना मारून जखमी केले.
चिखली येथे घर खाली करण्याच्या वादातून थोरल्या भावाचे बोट तोडले
घर खाली करण्याच्या वादातून तीन लहान भावांनी मिळून थोरल्या भावाचे पायाचे बोट तोडले. तसेच घर खाली न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (20 एप्रिल) मध्यरात्री पाटील नगर चिखली येथे घडली.
मजहरद्दिन मसीहुद्दीन खान (32) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लहान भाऊ रियाजुद्दीन मसीहुद्दीन खान (28), नुकद्दीन मसीहुद्दीन खान (26, रा. पाटीलनगर, चिखली) आणि अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मजहरद्दिन यांना त्यांच्या तीन लहान भावांनी मिळून घर खाली करण्याच्या कारणावरून मारहाण केली. तसेच त्यांच्या डाव्या पायाचे एक बोट तोडले. फिर्यादी यांच्या पत्नीला शिवीगाळ करून घर खाली केले नाही तर जिवे मारण्याची धमकी दिली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.
भोसरी येथे दारू पिण्यास पैसे न दिल्याने मारहाण (Pimpri Chinchwad Crime News 21 April 2025)
रस्त्याने जात असलेल्या एका व्यक्तीला अडवून त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. व्यक्तीने पैसे न दिल्याने त्यास मारहाण करून त्याचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेले. ही घटना शनिवारी (19 एप्रिल) रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास भोसरी पीएमटी बस स्टॉप जवळ घडली.
विशाल अशोक लांडगे (३८, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित देविदास पवार (20, भोसरी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल लांडगे हे भोसरी पीएमटी बस स्टॉप येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी आरोपी रोहित याने विशाल यांना अडवले. विशाल यांच्याकडे दारू पिण्यासाठी दोन हजार रुपयांची आरोपी रोहित याने मागणी केली. मात्र आपल्याजवळ पैसे नसल्याचे सांगत विशाल पुढे जाऊ लागले. त्यावेळी रोहित याने विशाल यांच्या खिशातून एक मोबाईल फोन काढला. त्यानंतर दुसरा मोबाईल फोन जबरदस्तीने घेत असताना त्यांच्या झटापट झाली. आरोपीने विशाल यांचे 42 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेले. तसेच त्यांना मारहाण केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.